केमिकल कंपनीतून दुर्गंधीयुक्त वासाने नागरिक त्रस्त

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : पैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यासह इतर केमिकल कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त असह्य वासामुळे मुधलवाडी येथील विद्यार्थी तसेच परिसरातील काही गावांना तसेच जवळच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना जेवण करणेही अशक्य झाले आहे.
एमआयडीसीतील शालिनी केमिकल कंपनीमधून घातक रासायनिक उत्सर्जन होत असल्याने, तसेच या पट्ट्यात असलेल्या इतर कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना व जवळच्या शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या कंपन्यांची तपासणी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एमआयडीसीतील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील शालिनी केमिकल्स कंपनीमधून सतत दुर्गंधीयुक्त वायू आणि विषारी धुके बाहेर पडत असल्यामुळे परिसरातील संपूर्ण वातावरण
 प्रदूषित होत आहे. 

या दुर्गंधीयुक्त वायू आणि विषारी धुक्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार या भागातील इतर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून व शाळेच्या मुख्यध्यापकांकडून प्रदूषण मंडळाकडे करण्यात आली आहे. परंतु प्रदूषण मंडळ याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. केमिकल कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त आणि असह्य वासामुळे अनेक वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्रव्यवहार करून त्याबाबत पाठपुरावा केला आहे. 

मात्र संबंधित कंपनीवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी या कंपनीत आगीची घटना घडली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक प्रक्षण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी काही केमिकल कंपन्यांची पाहणी केली होती. मात्र, काय कारवाई करण्यात आली? हा संशोधनाचा विषय झाला आहे.